Mumbai News : सार्वजनिक ठिकाणे किंवा रेल्वे स्थानकांवर चोरी होण्याच्या घटना सर्वश्रुत आहेत, मात्र मुंबई महानगरपालिकेचे हृदय मानल्या जाणाऱ्या ‘स्थायी समिती’ सभागृहातच चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रभाग क्रमांक ५६ च्या नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांच्या पर्समधून २० हजार रुपये चोरीला गेल्याने पालिकेच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
महानगरपालिकेच्या अर्थकारणावर शिक्कामोर्तब करणाऱ्या स्थायी समितीची बैठक संपल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मिळालेल्या माहितीनुसार, बैठक आटोपल्यानंतर नगरसेविका लक्ष्मी भाटिया आपली पर्स सभागृहात ठेवून भोजन करण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. काही वेळानंतर त्या परतल्या असता, त्यांना आपल्या पर्सची चैन उघडी असल्याचे आणि पर्समधील सामानाची छेडछाड झाल्याचे निदर्शनास आले. संशय आल्याने त्यांनी तात्काळ तपासणी केली असता, पर्समध्ये ठेवलेले २०,००० रुपये गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्यासोबत असलेल्या सहकारी नगरसेविकांनीही पर्सची विस्कळीत अवस्था पाहिल्याचे भाटिया यांनी सांगितले.
सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे आणि सीसीटीव्हीचा अभाव-
ज्या सभागृहात मुंबईचा अर्थसंकल्प निश्चित केला जातो, तिथेच लोकप्रतिनिधींच्या वस्तू सुरक्षित नसल्याने सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अत्यंत कडेकोट बंदोबस्त असलेल्या या भागात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची बाब आता उघड झाली आहे. सीसीटीव्ही नसल्यामुळे ही चोरी कोणी केली, याचा शोध घेणे प्रशासनासाठी कठीण झाले आहे. “जर महानगरपालिकेच्या तिजोरीतच लोकप्रतिनिधींच्या पर्स सुरक्षित नसतील, तर सामान्य मुंबईकरांच्या सुरक्षेचे काय?” असा संतप्त सवाल लक्ष्मी भाटिया यांनी उपस्थित केला आहे.
प्रशासनाकडे तक्रार आणि राजकीय पडसाद
या घटनेनंतर लक्ष्मी भाटिया यांनी तात्काळ महापौर, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती अध्यक्ष आणि सुरक्षा विभागाच्या पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकारावर मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “सभागृहातच सुरक्षेची अवस्था अशी असेल, तर सामान्य मुंबईकरांच्या सुरक्षेचे काय?” असा टोला लगावला.











