Home / मनोरंजन / Prasad Vedpathak : घाटकोपरमधील ‘पांढऱ्या पट्टी’चा वाद मिटला; मात्र जैन साधू-साध्वींच्या ‘त्या’ पांढऱ्या पट्ट्यांवरून प्रसाद वेदपाठकचा पुन्हा एकदा नवा व्हिडिओ व्हायरल!

Prasad Vedpathak : घाटकोपरमधील ‘पांढऱ्या पट्टी’चा वाद मिटला; मात्र जैन साधू-साध्वींच्या ‘त्या’ पांढऱ्या पट्ट्यांवरून प्रसाद वेदपाठकचा पुन्हा एकदा नवा व्हिडिओ व्हायरल!

Prasad Vedpathak : मुंबईतील घाटकोपर परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात अनधिकृतपणे मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीवरून सुरू झालेला वाद आता एका...

By: Team Navakal
Prasad Vedpathak
Social + WhatsApp CTA

Prasad Vedpathak : मुंबईतील घाटकोपर परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात अनधिकृतपणे मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीवरून सुरू झालेला वाद आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर आणि युट्यूबर प्रसाद वेदपाठक याने या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण प्रकाशझोतात आले होते. संबंधित सोसायटीत राहणाऱ्या एका जैन धर्मीय कुटुंबाने, त्यांच्या जैन साध्वींच्या सुलभ गमनासाठी, कोणतीही पूर्वपरवानगी न घेता सोसायटीच्या सामायिक आवारात ही पांढरी पट्टी आखली होती. या प्रकारामुळे आपल्यासह आपल्या कुटुंबाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा दावा प्रसादने केला होता. त्याने या संदर्भात समाजमाध्यमांवर प्रसारित केलेला व्हिडीओ अल्पावधीतच तुफान व्हायरल झाला आणि त्यावर सार्वजनिक स्तरावर उलटसुलट चर्चांना उधाण आले.

प्रसाद वेदपाठकच्या भूमिकेला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला, तसेच वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनीही या संवेदनशील विषयाची गंभीर दखल घेतली. धार्मिक श्रद्धा आणि आचार हे वैयक्तिक अथवा घरगुती पातळीवर पाळले जावेत, सार्वजनिक किंवा गृहनिर्माण संस्थांच्या सामायिक जागांवर अशा प्रकारे अनधिकृत बदल करून धार्मिक तेढ निर्माण करू नये, अशी स्पष्ट आणि ठाम भूमिका प्रसादने मांडली होती. हा वाद तब्बल पाच दिवस धुमसत राहिल्यानंतर, अखेर प्रशासकीय किंवा अंतर्गत सामंजस्याने त्या पांढऱ्या पट्टीवर मूळ रंगाचे रंगकाम करून ती हटवण्यात आली. या यशानंतर प्रसादने “माझ्यासाठी हा प्रश्न आता मिटला आहे,” अशी शिर्षकवजा जोडpost करत, पांढरी पट्टी पुसली गेल्याचा आनंददायी व्हिडीओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आणि या प्रकरणावर पडदा पडल्याचे जाहीर केले.

परंतु, हा वाद स्थानिक सोसायटीपुरता मर्यादित राहिला नसून संपूर्ण घाटकोपर परिसरात अशाच प्रकारची परिस्थिती असल्याचे आता समोर आले आहे. प्रसादने नुकताच आणखी एक नवा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित केला असून, तो सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या नव्या व्हिडीओमध्ये त्याने केवळ आपली सोसायटीच नव्हे, तर घाटकोपर पश्चिम भागातील अनेक सार्वजनिक फुटपाथ आणि रस्त्यांवर अशाच प्रकारच्या पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्याचे उघड केले आहे. सार्वजनिक पायवाटांवर मारलेल्या या पट्ट्यांची झलक दाखवताना त्याने व्हिडीओच्या पार्श्वभूमीला “भगवान, है कहाँ रे तू?” हे अत्यंत मार्मिक गाणे जोडले आहे, तसेच त्यावर ‘फूटपाथवरील पांढरी रेषा’ (WHITE LINE ON FOOTPATH) असे ठळक अक्षरात नमूद केले आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने स्थानिक प्रशासनाला उपरोधिक टोला लगावला असून, “घाटकोपर पश्चिम येथील फुटपाथवर ज्या तत्परतेने या पट्ट्या मारल्या गेल्या आहेत, त्याच तळमळीने आणि गतीने परिसरातील स्पीड ब्रेकर आणि झेब्रा क्रॉसिंगवरही रंगकाम करावे,” अशी खोचक आणि आग्रही मागणी कॅप्शनच्या माध्यमातून केली आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या