Home / महाराष्ट्र / Sameer Bhujbal : छगन भुजबळांच्या हातातून राज्यसभा नक्की कशी गेली? पुतणे समीर भुजबळ यांनी पडद्यामागील ‘त्या’ मोठ्या गेमचा केला संपूर्ण खुलासा!

Sameer Bhujbal : छगन भुजबळांच्या हातातून राज्यसभा नक्की कशी गेली? पुतणे समीर भुजबळ यांनी पडद्यामागील ‘त्या’ मोठ्या गेमचा केला संपूर्ण खुलासा!

Sameer Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत (अजित पवार गट) राज्यसभा उमेदवारी आणि आगामी मंत्रिमंडळ विस्तारातील स्थानावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क...

By: Team Navakal
Sameer Bhujbal
Social + WhatsApp CTA

Sameer Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत (अजित पवार गट) राज्यसभा उमेदवारी आणि आगामी मंत्रिमंडळ विस्तारातील स्थानावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेली राज्यसभेची जागा आपल्याला मिळावी आणि पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिली जावी, असा आग्रह ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी धरला होता. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) केंद्रीय नेतृत्वाने तांत्रिक कारणास्तव हा प्रस्ताव स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली. अखेर, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे नेते राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. राजेंद्र जैन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची या जागेवर बिनविरोध निवड झाली आहे.

आपल्या कुटुंबातील सदस्याला संसदेत किंवा मंत्रिमंडळात अपेक्षित संधी न मिळाल्यामुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. “राजकारणात इतर वरिष्ठ नेत्यांच्या मुला-बाळांना आणि नातेवाईकांना जो न्याय लावला जातो, तोच न्याय मला आणि माझ्या कुटुंबालाही मिळायला हवा,” अशा शब्दांत त्यांनी आपली खंत बोलून दाखवली होती. विधानपरिषद निवडणुकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांना पक्षाने पुन्हा संधी देऊन बिनविरोध निवडून आणले, मग समीर भुजबळ यांच्या नावाचा विचार का केला गेला नाही? असा सूर भुजबळ समर्थकांकडून उमटत होता. त्यामुळे भुजबळ विरुद्ध पक्षश्रेष्ठी असा सुप्त संघर्ष पाहायला मिळत होता.

“मी नाराज नाही, भाजपने शब्द दिलाय”; समीर भुजबळांचा मोठा खुलासा
या सर्व पार्श्वभूमीवर आणि राजकीय गदारोळावर आता स्वतः माजी खासदार समीर भुजबळ यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असून, राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडींमागील ‘इनसाईड स्टोरी’ प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे. आपण किंवा आपले कुटुंब पक्षात नाराज नसल्याचे स्पष्ट करत समीर भुजबळ म्हणाले, “मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली होती. परंतु, तांत्रिक प्रक्रिया आणि मंत्रिपदाच्या शपथेसाठी अत्यंत कमी वेळ शिल्लक असल्यामुळे ऐनवेळी तो शपथविधी पार पडू शकला नाही. मात्र, महायुतीमधील ज्येष्ठ नेत्यांकडून आणि भाजपकडून आम्हाला स्पष्ट शब्द देण्यात आला आहे. आगामी काळात जेव्हा कधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल किंवा फेरबदल केले जातील, त्यावेळी मला मंत्रिमंडळात नक्कीच मानाचे स्थान दिले जाईल.”

गेल्या २५ वर्षांतील पक्षनिष्ठा आणि राजकीय योगदान
समीर भुजबळ यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाचा उल्लेख करत पक्षात आपल्याला संधी मिळणे हा आपला हक्क कसा आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “माजी खासदार म्हणून माझी संसदेत काम करण्याची पार्श्वभूमी आहे, परंतु छगन भुजबळ साहेबांची स्वतः संसदेत (राज्यसभेत) जाण्याची तीव्र इच्छा होती. भूतकाळात त्यांच्यासाठी २ ते ३ वेळा अशा संधी चालून आल्या होत्या, पण काही अपरिहार्य कारणांमुळे ते शक्य झाले नाही. म्हणूनच माझा राज्यसभेवर जाण्याचा कोणताही विचार किंवा हट्ट नव्हता. मी बालपणापासून राजकारण जवळून पाहत आलो आहे. सुरुवातीला शिवसैनिक म्हणून काम केल्यानंतर, साहेबांसोबत मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.”

“१९९९ सालापासून, म्हणजेच गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ मी पक्षासाठी अविरतपणे काम करत आहे. पक्षाचा झेंडा तयार करण्यापासून, निवडणूक चिन्ह ठरवण्यापर्यंत आणि षण्मुखानंद हॉल किंवा दादरच्या शिवाजी पार्क मैदानातील सभांचे चोख नियोजन करण्यापर्यंत सर्व संघटनात्मक जबाबदाऱ्या मी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाच्या सभांचे नियोजन माझ्या देखरेखीखाली झाले आहे. त्यामुळे इतकी वर्षे एकनिष्ठेने काम केल्यानंतर मला भविष्यात मंत्रिपदाची संधी मिळण्यात कोणतीही अडचण नाही,” असा ठाम विश्वास समीर भुजबळ यांनी व्यक्त केला.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या