Trump on India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनचा उल्लेख ‘नरक’ करणाऱ्या एका पॉडकास्टला सोशल मीडियावर प्रसिद्धी दिल्यानंतर दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र, हा वाद अधिक वाढू नये यासाठी अमेरिकन प्रशासनाने तातडीने हालचाली करत ‘डॅमेज कंट्रोल’ सुरू केले आहे.
अमेरिकन दूतावासाने भारताचे कौतुक करत हा वाद शांत करण्याचा प्रयत्न केला असून, भारतानेही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अमेरिकन दूतावासाचे स्पष्टीकरण
ट्रम्प यांच्या विधानामुळे भारतात संतापाची लाट उसळल्यानंतर अमेरिकन दूतावासाच्या प्रवक्त्याने परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. “राष्ट्राध्यक्षांनी नेहमीच म्हटले आहे की भारत हा एक महान देश असून तिथले नेतृत्व माझे चांगले मित्र आहेत,” असे स्पष्टीकरण दूतावासाने दिले आहे. मायकेल सॅव्हेज यांच्या वर्णद्वेषी टिप्पणीमुळे निर्माण झालेला दूरावा दूर करण्यासाठी ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.
भारताची ‘मोजक्या’ शब्दांत प्रतिक्रिया
या प्रकरणावर भारताने थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा निषेध न करता आपली नाराजी व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी या वादावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की, “आम्ही यासंदर्भातील काही अहवाल पाहिले आहेत, सध्या तरी मी यावर इतकेच बोलेन.” भारताने या विधानावर अधिक भाष्य करणे टाळले असले तरी, परराष्ट्र मंत्रालयाचा हा संयम बरेच काही सांगून जाणारा आहे.
वादाचे मूळ काय?
हा संपूर्ण वाद मायकेल सॅव्हेज यांच्या ‘सॅव्हेज नेशन’ या पॉडकास्टमुळे सुरू झाला. यामध्ये सॅव्हेज यांनी अमेरिकेतील जन्मसिद्ध नागरिकत्व कायद्यावर टीका करताना भारतीय आणि चिनी स्थलांतरितांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर भाष्य केले होते. स्थलांतरित लोक या कायद्याचा गैरवापर करत असल्याचे सांगताना त्यांनी भारत आणि चीनचा उल्लेख ‘नरक’ असा केला होता. ट्रम्प यांनी ही पोस्ट शेअर केल्याने भारतात त्याचे तीव्र पडसाद उमटले.
नागरिकत्वाचा लढा आता सर्वोच्च न्यायालयात
डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत आल्यावर काही तासांतच बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुलांना मिळणारे जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. मात्र, अमेरिकेतील कनिष्ठ न्यायालयांनी हा आदेश असंवैधानिक ठरवून त्याला स्थगिती दिली आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असून, ट्रम्प यांनी स्वतः या सुनावणीला उपस्थित राहून न्यायव्यवस्थेवर टीका केली आहे.
हे देखील वाचा –











