MHADA Lottery 2026: मुंबईत स्वतःचे घर असावे असे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या 2,640 सदनिकांच्या विक्री प्रक्रियेला आता मुदतवाढ देण्यात आली आहे. तांत्रिक कारणांमुळे किंवा अधिक नागरिकांना संधी मिळावी या उद्देशाने प्रशासनाने अर्ज नोंदणी आणि अनामत रक्कम भरण्याच्या तारखांमध्ये बदल केला आहे.
काय आहे नवीन वेळापत्रक?
सुधारित निर्णयानुसार, आता इच्छुक अर्जदारांना 14 मे 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येतील. अर्जासोबतची अनामत रक्कम (Deposit) भरण्यासाठी 15 मे रात्रीपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. ज्यांना बँकेत जाऊन रक्कम भरायची आहे, त्यांना 15 मे रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.
महत्त्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत:
- 22 मे (दुपारी 3 वाजता): अर्जांची प्रारूप यादी प्रसिद्ध होईल.
- 25 मे (दुपारी 3 वाजेपर्यंत): हरकती किंवा दावे दाखल करण्याची मुदत.
- 29 मे (दुपारी 3 वाजता): पात्र अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.
- 5 जून 2026: सदनिकांच्या वाटपाची मुख्य संगणकीय सोडत (Draw) जाहीर होईल.
कोणत्या भागात आणि किती घरे उपलब्ध?
या लॉटरीमध्ये विक्रोळी, गोरेगाव, बोरीवली, चेंबूर, वांद्रे, घाटकोपर, दादर आणि वडाळा यांसारख्या मोक्याच्या ठिकाणांवरील घरांचा समावेश आहे. एकूण 2,640 घरांची विभागणी खालीलप्रमाणे आहे:
- अत्यल्प उत्पन्न गट (EWS): 145 सदनिका
- अल्प उत्पन्न गट (LIG): 858 सदनिका
- मध्यम उत्पन्न गट (MIG): 1,408 सदनिका
- उच्च उत्पन्न गट (HIG): 229 सदनिका
घरांची स्थिती आणि देखभाल
या सोडतीत म्हाडाने स्पष्ट केले आहे की, विकासकांकडून प्राप्त झालेली घरे ‘जशी आहेत त्या स्थितीमध्ये’ विकली जातील. मात्र, यशस्वी अर्जदाराला ताबा देण्यापूर्वी घराची आवश्यक डागडुजी आणि दुरुस्ती म्हाडा करून देणार आहे. तसेच, जर संबंधित सदनिकेचा मालमत्ता कर किंवा देखभाल खर्च (Maintenance) थकीत असेल, तर त्याची पूर्ण अदायगी म्हाडातर्फे केली जाईल, जेणेकरून विजेत्याला कोणताही अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पडणार नाही.
हे देखील वाचा –
Fuel Price Update: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होणार का? सरकारने दिले स्पष्टीकरण











