Delhi rape case : 2012 च्या निर्भया प्रकरणानंतर दिल्ली पुन्हा धावत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेने 11 मे रोजी हादरली. अत्यंत क्लेशदायक बाब अशी की, अत्याचार झालेल्या दुर्दैवी पीडित महिलेने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. ती म्हणाली की, मी रुग्णालयात राहिले तर माझ्या तीन मुलींसाठी स्वयंपाक कोण करणार? माझ्या पतीची काळजी कोण घेणार? तिच्या या सवालांना कुणाकडेच उत्तर नव्हते. एक महिला आपल्या कुटुंबासाठी किती सोसते त्याचे हे जळजळीत वास्तव आहे.
पोलिसांनी या प्रकरणात सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून आरोपी चालक उमेश आणि वाहक रामेंद्र यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या गुन्ह्यात वापरलेली बस जप्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला मंगोलपुरी येथील कारखान्यात काम करते आणि आपल्या कुटुंबासह पीतमपुरा परिसरात राहते. ती कामावरून घरी परतत होती. सरस्वती विहार परिसरातील बी-ब्लॉक बस स्टँडजवळ ती ई-रिक्षातून उतरून पुढे पायी जात होती. त्यावेळी तिला रस्त्याच्या कडेला एक बस उभी दिसली. बसजवळ उभ्या असलेल्या वाहकाकडे तिने वेळ विचारली. मात्र, वाहकाने तिला जवळ बोलावून जबरदस्तीने बसमध्ये ओढले. त्यानंतर बस चालक उमेश आणि वाहक रामेंद्र यांनी धावत्या बसमध्ये जवळपास दोन तास तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. बस दिल्लीच्या विविध भागांतून नांगलोईच्या दिशेने फिरत होती.
ही बस बिहारमध्ये नोंदणीकृत स्लीपर बस होती आणि तिच्या खिडक्यांना पडदे लावलेले होते. त्यामुळे बाहेरून आत काय सुरू आहे हे दिसत नव्हते. अत्याचारानंतर आरोपींनी महिलेला नांगलोई मेट्रो स्थानकाजवळ सोडून दिले. गंभीर अवस्थेत असलेल्या महिलेने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तिला वैद्यकीय तपासणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तिच्या जखमांचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला. मात्र, महिलेने रुग्णालयात राहण्यास नकार दिला. तिने पोलिसांना सांगितले की, तिचा पती क्षयरोगाने आजारी असल्याने घरातच असतो. त्यामुळे तिला काम करणे गरजेचे आहे. शिवाय तिला 8, 6 आणि 4 वर्षांच्या तीन मुली आहेत. मी रुग्णालयात राहिले तर मुलांसाठी स्वयंपाक कोण करणार? नवर्याची काळजी कोण घेणार? असा सवाल विचारत त्या गंभीर अवस्थेतही तिने भरती होण्यास नकार दिला. महिलांच्या सुरक्षेबरोबरच आर्थिक आणि सामाजिक असुरक्षिततेचाही प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या घटनेमुळे 2012 मधील निर्भया प्रकरणाच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. त्यावेळी दिल्लीत एका पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करून अमानुष मारहाण करण्यात आली होती. त्या घटनेनंतर देशभरात आंदोलनांची लाट
उसळली होती.










