Actress Usha Chavan : मराठी चित्रपटसृष्टीत (Film Industry) १९८० ते ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण (Actress Usha Chavan)यांनी महाराष्ट्र शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेला प्रतिष्ठेचा व्ही. शांताराम (V. Shantaram) जीवनगौरव पुरस्कार ( Lifetime Achievement Award) त्यांनी परत केला आहे. ठाण्यातील टेंभी नाका परिसरातील ‘आनंद आश्रम’ येथे जाऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर पुरस्कार ठेवत त्यांनी शासन व्यवस्थेविरोधातील आपला संताप व्यक्त केला.
काय आहे संपूर्ण प्रकरण?

उषा चव्हाण या गेल्या २६ वर्षांपासून पुण्यातील धनकवडी परिसरातील आपल्या कौटुंबिक मालकीच्या जमिनीच्या हक्कासाठी कायदेशीर लढा (Legal Battle) लढत आहेत. या जमिनीच्या टीडीआर (TDR) प्रकरणात न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने लागल्यानंतरही प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
उषा चव्हाण यांनी दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्यासोबत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करत मराठी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. मात्र आज त्यांनाच स्वतःच्या हक्कासाठी शासन आणि प्रशासनाविरोधात संघर्ष करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
धनकवडी येथील त्यांच्या मालकीच्या जमिनीबाबत सुरू असलेल्या वादात उच्च न्यायालयाने संबंधित मालमत्ता अद्याप अविभाजित असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच या मालमत्तेमध्ये त्यांचे सुपुत्र हृदयनाथ कडू-देशमुख यांचा कायदेशीर हिस्सा असल्याचेही मान्य करण्यात आले. तरीदेखील पुणे महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांनी खासगी बिल्डर कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी बेकायदेशीररीत्या टीडीआर मंजूर केल्याचा आरोप उषा चव्हाण यांनी केला आहे.
त्यांनी थेट आरोप करत म्हटले की, ‘गंगा गोयल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या बिल्डर कंपनीला लाभ मिळावा यासाठी प्रशासनाकडून नियम डावलण्यात आले. न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतानाही संबंधित अधिकाऱ्यांकडून सातत्याने टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
न्याय नसेल तर पुरस्कार कशासाठी?”
या प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालय (CM Office), नगरविकास विभाग (Urban Development Department) तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रारी करूनही न्याय मिळाला नसल्याने अखेर त्यांनी शासनाने दिलेला सर्वोच्च सन्मान परत करण्याचा निर्णय घेतला.
आनंद आश्रम येथे पुरस्कार परत करताना उषा चव्हाण भावनिक झाल्या होत्या. “जर शासन मला न्याय देऊ शकत नसेल, तर असे पुरस्कार जवळ ठेवण्यात काय अर्थ आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते असल्याने त्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उषा चव्हाण यांची बोचरी प्रतिक्रिया

या संपूर्ण प्रकरणानंतर उषा चव्हाण यांनी व्यवस्थेवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली. त्या म्हणाल्या, “माझ्यासारख्या ख्यातनाम अभिनेत्रीला जर स्वतःच्या हक्कासाठी इतकी मोठी लढाई लढावी लागत असेल, तर महाराष्ट्रातील सामान्य मराठी कुटुंबांची अवस्था किती भयानक असेल, याचा विचार करून अंगावर काटा येतो.”
मानसिक त्रास (Mental Harassment) आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
अभिनेते मंगेश देसाई यांनी घेतली भेट
या घटनेनंतर अभिनेते मंगेश देसाई यांनी तातडीने उषा चव्हाण यांची भेट घेत त्यांची बाजू समजून घेतली. त्यांनी माध्यमांशी (Media) बोलताना सांगितले की, “१९८० ते ९० च्या दशकात रुपेरी पडदा गाजवणाऱ्या उषा चव्हाण यांनी शासनाकडून मिळालेला व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार आनंद आश्रम येथे परत केला आहे. पुण्यातील टीडीआर प्रकरणात न्याय मिळत नसल्याने त्यांनी ही भूमिका घेतली आहे.”
ते पुढे म्हणाले, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कलाकारांवर प्रेम करणारे नेते आहेत. ते निश्चितच या प्रकरणात लक्ष घालून न्याय मिळवून देतील, अशी अपेक्षा आहे.”
कोण आहेत उषा चव्हाण?

उषा चव्हाण यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी पुण्यात झाला. मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अभिनय, विनोदी शैली आणि दमदार उपस्थितीमुळे वेगळी छाप निर्माण केली. दादा कोंडके यांच्यासोबतची त्यांची जोडी विशेष गाजली. ‘सोंगाड्या’, ‘पांडू हवालदार’, ‘पळवा पळवी’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले.
चित्रपटसृष्टीत यशाच्या शिखरावर असतानाच त्यांनी १९७० मध्ये दत्तात्रय कडू-देशमुख यांच्याशी विवाह केला. लग्नानंतरही त्यांनी अभिनय सुरू ठेवत अनेक लोकप्रिय चित्रपट दिले. त्यांना हृदयनाथ कडू-देशमुख नावाचा मुलगा आहे.

उषा चव्हाण आणि दादा कोंडके यांची जोडी मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानली जाते. पडद्यावर प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या अभिनेत्रीच्या आयुष्यात मात्र अनेक संघर्ष आणि चढ-उतार आले. आता स्वतःच्या हक्कासाठी त्यांनी शासनाविरोधात उघडपणे भूमिका घेतल्याने राज्यभरात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
हे देखील वाचा –
त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेसला आग;तीन डबे प्रभावित
जरांगेंचे पुन्हा आंदोलन ! मात्र मुंबईत येणार नाही ! हा एकनाथ शिंदेंचा माणूस! सदावर्तेंचा गंभीर आरोप












