Home / देश-विदेश / Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचे 90 दिवसांत तब्बल 3,700 शेअर व्यवहार !वॉल स्ट्रीटवर खळबळ

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचे 90 दिवसांत तब्बल 3,700 शेअर व्यवहार !वॉल स्ट्रीटवर खळबळ

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2026 च्या पहिल्या तीन महिन्यांत 3,700 हून अधिक शेअर व्यवहार केल्याची माहिती...

By: Team Navakal
Donald Trump
Social + WhatsApp CTA
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2026 च्या पहिल्या तीन महिन्यांत 3,700 हून अधिक शेअर व्यवहार केल्याची माहिती उघड झाली आहे. या मोठ्या प्रमाणातील व्यवहारांमुळे वॉल स्ट्रीट (अमेरिकेचे आर्थिक केंद्र असलेला रस्ता) वर खळबळ उडाली आहे. याआधी 2025 च्या शेवटच्या तिमाहीत ट्रम्प यांनी केवळ 380 व्यवहार केले होते. मात्र, यावर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत त्यांनी दररोज सरासरी 40 पेक्षा जास्त व्यवहार केले. तंत्रज्ञान, वित्त, संरक्षण, विमाननिर्मिती आणि मीडिया क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांमध्ये ट्रम्प किंवा त्यांच्या सल्लागारांनी कोट्यवधी डॉलरचे व्यवहार केले आहेत.


राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एनव्हिडिया, ओरॅकल, मायक्रोसॉफ्ट, बोईंग आणि  कॉस्टको यांसारख्या कंपन्यांचे प्रत्येकी किमान 10 लाख डॉलर किमतीचे शेअर्स खरेदी केले आहेत. याशिवाय त्यांनी अ‍ॅमेझॉन, मेटा, उबर, इबे, डॉलर ट्री यांच्याशी संबंधित शेअर व्यवहारही केले आहेत. 10 फेब्रुवारी रोजी ट्रम्प यांनी मायक्रोसॉफ्ट, मेटा आणि अमेझॉनमधील 50 लाख ते 2.5 कोटी डॉलर किमतीची गुंतवणूक विकल्याचीही माहिती उघड झाली आहे. या कंपन्यांपैकी अनेक कंपन्या थेट अमेरिकन सरकारी धोरणे, नियम आणि भू-राजकीय निर्णयांवर अवलंबून आहेत. उदाहरणार्थ, एनव्हिडियाला चीनला एआय चिप्स निर्यात करण्यासाठी अमेरिकन सरकारची मंजुरी आवश्यक असते. बोईंगला संरक्षण आणि विमान क्षेत्रातील सरकारी कंत्राटांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. तसेच मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅमेझॉन आणि मेटासारख्या मोठ्या टेक कंपन्यांवर सतत अँटी ट्रस्ट चौकशी, एआय नियमन आणि फेडरल धोरणांचा परिणाम होत असतो.


यापूर्वीच्या अनेक माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी ‘ब्लाईंड ट्रस्ट’चा वापर करून वैयक्तिक गुंतवणूक व्यवस्थापनापासून
स्वतःला दूर ठेवले होते. ‘ब्लाईंड ट्रस्ट’ ही एक अशी आर्थिक व्यवस्था असते, ज्यामध्ये एखादी व्यक्ती आपल्या मालमत्तेचे संपूर्ण नियंत्रण एका स्वतंत्र विश्वस्ताकडे सोपवले जाते. लाभार्थी किंवा निर्मात्याला विशिष्ट गुंतवणुकीची माहिती नसते आणि त्यात हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नसतो. याचा उपयोग प्रामुख्याने हितसंबंधांचे संघर्ष टाळण्यासाठी केला जातो. मात्र, ट्रम्प यांनी आपल्या व्यावसायिक हितसंबंधांपासून स्वतःला पूर्णपणे अलिप्त ठेवलेले नाही. त्यामुळेच त्यांच्यावर टीका होत आहे. ताज्या माहितीमुळे इराणविषयी ट्रम्प यांच्या सार्वजनिक वक्तव्यांपूर्वी तेल आणि शेअर बाजारात झालेल्या संशयास्पद व्यवहारांकडेही लक्ष वेधले गेले आहे. इराण चर्चेत प्रगती होत असल्याचे ट्रम्प यांनी सूचित करण्यापूर्वी काही गुंतवणूकदारांनी तेलाच्या किमती घसरणार आणि अमेरिकन शेअर बाजार वधारणार असा अंदाज बांधून मोठे व्यवहार केल्याची चर्चा होती. त्यानंतर खरोखरच तेलाच्या किमती घसरून शेअर बाजार तेजीत गेला. या व्यवहारांशी ट्रम्प यांचा थेट संबंध असल्याचा पुरावा समोर आलेला नसला, तरी संवेदनशील राजकीय माहिती आणि आर्थिक बाजार यांच्या संभाव्य संबंधांवर चर्चा होत आहे.


ट्रम्प यांचे जावई आणि मध्य पूर्व विषयक दूत जॅरेड कुशनर यांच्या आखाती देशांतील आर्थिक हितसंबंधांवरही पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांची गुंतवणूक कंपनी ‘अ‍ॅफिनिटी पार्टनर्स’ सौदी अरेबियासह मध्य पूर्वेत अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करत असल्याचे म्हटले जात आहे. व्हाईट हाऊसने ट्रम्प यांच्यावरील सर्व आरोप फेटाळत ते नेहमी अमेरिकन जनतेच्या हितासाठीच काम करतात आणि त्यांचे कोणतेही हितसंबंध नाहीत, असे स्पष्ट केले आहे. ‘द ट्रम्प ऑर्गनायझेशन’च्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ट्रम्प यांच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन स्वतंत्र वित्तीय संस्थांकडून केले जाते. ट्रम्प किंवा त्यांचे कुटुंबीय थेट व्यवहार नियंत्रित करत नाहीत. मात्र यामुळे सत्तेवर असलेल्या राष्ट्राध्यक्षांनी  सरकारी धोरणांवर प्रभाव टाकणार्‍या कंपन्यांमध्ये सक्रियपणे शेअर व्यवहार करावेत का, याबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या