Solapur Summer Camp Accident : सोलापूर (Solapur )जिल्ह्यातील बार्शी शहरातील शिवशक्ती मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट समर कॅम्पमध्ये (Cricket summer camp ) काल सकाळी घडलेल्या भीषण अपघातात १५ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. क्रिकेट पिच तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा जड लोखंडी रोलर अंगावरून गेल्याने आरव ऊर्फ वीरेन योगीराज चौधरी (Aarav alias Viren Yogiraj Chaudhary) या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेमुळे बार्शी शहरासह संपूर्ण क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून क्रिकेट कॅम्पमधील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने शिवशक्ती मैदानावर उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिर (Summer Camp) आयोजित करण्यात आले होते. शहरातील अनेक विद्यार्थी या शिबिरात क्रिकेटचे प्रशिक्षण घेत होते. आरव चौधरी हाही क्रिकेटची आवड असल्याने नियमित फी भरून या शिबिरात सहभागी झाला होता. कॅम्पमध्ये विवेक दुगम आणि अक्षय देबडवार हे प्रशिक्षक मुलांना प्रशिक्षण देत होते.
सकाळी आरव नेहमीप्रमाणे सरावासाठी मैदानावर पोहोचला होता. सकाळी साडेसातच्या सुमारास सराव सुरू असताना १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांकडून क्रिकेट पिच सपाट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जड लोखंडी रोलरला (Heavy iron roller) ओढण्याचे काम करून घेतले जात होते. याच दरम्यान दुर्दैवी घटना घडली.
मुलांचा गट रोलर ओढत असताना अचानक आरवचा पाय घसरला. तोल गेल्याने तो जमिनीवर कोसळला आणि पुढे सरकत असलेला जड रोलर त्याच्या पायापासून छातीपर्यंत अंगावरून गेला. रोलरचे वजन अत्यंत जास्त असल्याने आरवला गंभीर अंतर्गत दुखापत झाली. अपघातानंतर मैदानावर एकच गोंधळ उडाला आणि उपस्थित मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेनंतर प्रशिक्षक (Coach)आणि इतरांनी आरवला तातडीने उपचारासाठी बार्शीतील जगदाळे मामा रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेने चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, आरवचे वडील योगीराज चौधरी यांनी या घटनेबाबत गंभीर आरोप केले आहेत. अल्पवयीन मुलांकडून इतक्या जड उपकरणाचे काम करून घेणे योग्य होते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच रोलर ओढताना प्रशिक्षक किंवा संबंधित कर्मचारी घटनास्थळी उपस्थित नव्हते, असा आरोपही त्यांनी केला. योग्य देखरेख आणि सुरक्षा उपाययोजना (Safety Measures) असत्या तर हा अपघात टाळता आला असता, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर क्रिकेट प्रशिक्षण शिबिरांमध्ये मुलांच्या सुरक्षेसाठी कोणते नियम पाळले जातात, अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून जड उपकरणे हाताळून घेण्यास परवानगी आहे का, तसेच प्रशिक्षकांची जबाबदारी काय असते, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आरव चौधरी हा क्रिकेटप्रेमी आणि होतकरू विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. त्याच्या अकाली निधनामुळे मित्रपरिवार, शिक्षक आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे. बार्शीतील क्रीडा वर्तुळावर या घटनेमुळे शोककळा पसरली असून, अशा प्रकारच्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर सुरक्षा नियम लागू करण्याची मागणी जोर धरत आहे.
हे देखील वाचा –
मनोज जरांगेंचे मध्यरात्री उपोषण मागे; सरकारकडून मागण्या मान्य, नेमका तोडगा काय निघाला?
शासकच बनले मारेकरी!”; पुतण्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ममता बॅनर्जींचा भाजप सरकारवर हल्लाबोल
सायन – माटुंगादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली ; मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने










