Home / देश-विदेश / IPL : आयपीएल स्पर्धेतील क्रिकेटपटूंच्या विमानासाठी बेसुमार इंधन का वापरता? उद्योजकांचे क्रीडामंत्र्यांना पत्र

IPL : आयपीएल स्पर्धेतील क्रिकेटपटूंच्या विमानासाठी बेसुमार इंधन का वापरता? उद्योजकांचे क्रीडामंत्र्यांना पत्र

IPL : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पेट्रोल आणि डिझेलचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. इंधनाची...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

IPL : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पेट्रोल आणि डिझेलचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. इंधनाची समस्या अतिशय गंभीर आहे हे मात्र उद्योजकांच्या एका पत्राने उघड झाले आहे. भारतीय उद्योजकांची ‘चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री’ (सीटीआय) या संघटनेने केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांना पत्र लिहून सवाल केला आहे की, इंधन समस्या गंभीर असताना आयपीएलच्या क्रिकेटपटूंसाठी विमानाच्या इंधनाचा बेसुमार वापर का सुरू आहे? उद्योजकांनी मागणी केली की, हा वापर कमी करा, मोजक्या शहरांमध्ये सामने ठेवा आणि उर्वरित सामने प्रेक्षकांविना  खेळवा. अशी विनंती पहिल्यांदाच होत आहे. प्रेक्षकांच्या तिकिटावर कोट्यवधीची कमाई होते, पण इंधन टंचाई इतकी जास्त आहे की, या कमाईवर पाणी सोडा आणि इंधन वाचवा असे उद्योजगांचे म्हणणे आहे. याआधी फक्त कोरोना काळात आयपीएलचे काही सामने  प्रेक्षकांविना खेळवले गेले होते.


‘सीटीआय’चे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी क्रीडामंत्री मांडवीय यांना पत्र लिहून म्हटले आहे की, यंदाची आयपीएल स्पर्धा 31 मार्चपासून सुरू झाली आहे. आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या संघांनी आतापर्यंत हजारो किलोमीटरचा हवाई आणि रस्तेमार्गे प्रवास केला आहे. स्पर्धेचे वेळापत्रक आणि विविध शहरांमध्ये केलेले सामन्यांचे नियोजन यामुळे खेळाडूंचा हा प्रवास आवश्यक होता, हे जरी मान्य केले तरी सध्याच्या परिस्थितीत अशाप्रकारे वारेमाप विमान प्रवास केल्याने सरकारवर त्याचा अतिरिक्त भार पडू शकतो. सध्या पुरवठा साखळीत बाधा निर्माण झाल्यामुळे कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे देशाच्या परकीय चलन गंगाजळीवर प्रचंड दबाव आहे. सरकारचे प्रत्येक कार्यालय, प्रत्येक राजकीय नेता, अधिकारी, स्वतः पंतप्रधान मोदी आणि सर्वसामान्य माणूस असे सर्वच लोक इंधनबचत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. अशा वेळी आयपीएल स्पर्धेवर मात्र देशावर ओढवलेल्या संकटाचा काहीही परिणाम झालेला नाही असे दिसते, हे संतापजनक आहे. हजारो प्रेक्षकांनी जर हे सामने पाहण्यास प्रवास केला नाही तर भरपूर इंधन वाचेल.


इंधनाची बचत करण्यासाठी आयपीएलच्या उर्वरित कार्यक्रमात बदल करून सामने प्रेक्षकांविना आणि मोजक्या शहरांत खेळवले गेले तर संघांचा प्रवासही कमी होईल. तसेच प्रेक्षकांकडून खर्च होणारे इंधनही वाचेल. आयपीएलमधील क्रिकेटपटू स्वतंत्र बोईंग-737 किंवा एअरबस ए-320 यांसारख्या विमानांचा वापर करतात. या विमानांना एका तासासाठी 2,400 ते 3 हजार लीटर उच्च दर्जाचे अ‍ॅव्हिएशन टर्बाईन फ्युएल (एटीएफ) लागते. या हिशेबाने विमान प्रवास दोन तासांचा असेल तर त्यासाठी सुमारे 5 ते 6 हजार लीटर इंधनाचा वापर होतो. प्रवास दोन तासांहून जास्त कालावधीचा असेल आणि विमान जास्त वजनाचे असेल तर हा आकडा 7 ते 8 हजार लिटरवर जातो. प्रत्येक संघाने दहा ठिकाणी प्रवास केला तर एकेका संघाकडून 50 ते 60 हजार लिटर इंधन खर्च केले जाते. सध्याच्या परिस्थितीत इंधनाचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर वापर करणे देशहिताचे नाही. त्यामुळे आयपीएलचा उर्वरित कार्यक्रम नव्याने आखण्याचे निर्देश आयोजकांना द्यावेत, अशी विनंती गोयल यांनी पत्राद्वारे केली आहे. विशेष म्हणजे, नुकतीच पाकिस्तानात पाकिस्तान सुपर लीग ही स्पर्धा पार पडली. काटकसरीच्या कारणास्तव या स्पर्धेतही बदल करण्यात आला. या स्पर्धेचा उद्धाटन सोहळा रद्द करण्यात आला. नियोजित सहा शहरांऐवजी फक्त दोन शहरांतच सगळे सामने खेळवण्यात आले. हे सामने प्रेक्षकांशिवायच खेळवले गेले. आता या स्पर्धेत अंतिम सामन्यासह एकूण 12 सामने शिल्लक आहेत. यामध्ये 8 साखळी सामने आणि 4 प्लेऑफ सामन्यांचा समावेश आहे. ’सीटीआय’च्या या पत्राला क्रीडामंत्री कसा प्रतिसाद देतात आणि आयपीएलचे सामने काही ठिकाणी व खरोखरच प्रेक्षकांविना खेळवले जातील का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या