Manoj Jarange Patil on Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या लढ्याची धग अद्याप कायम असून आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. जालन्यामध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली.
सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे मराठा समाजात तीव्र असंतोष पसरला असून, लवकरच आंदोलनाचा पुढील टप्पा सुरू होणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.
“फडणवीसांमुळे मराठ्यांचे नुकसान”
मनोज जरांगे यांनी अतिशय तीव्र शब्दांत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. “मराठा समाजाची मते आणि नेते सगळ्यांना हवे असतात, पण समाजातील तरुण मुले पुढे गेलेली कोणालाही बघवत नाही. देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाचे मोठे नुकसान केले आहे,” असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला.
आठ महिने झाले, तरी आश्वासन हवेतच!
मुंबईतील आंदोलनादरम्यान सरकारने दिलेली आश्वासने कशी पाळली नाहीत, याचा पाढाच त्यांनी वाचला:
१. गॅझेटचा प्रश्न: मुंबई आंदोलनावेळी सातारा संस्थानच्या गॅझेटचा जीआर अवघ्या एका महिन्यात काढू, असे शब्द सरकारने दिला होता. मात्र आज ८ महिने उलटून गेले तरी त्यावर काहीही निर्णय झालेला नाही.
२. गुन्हे मागे घेतले नाहीत: आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आश्वासनही अजून कागदावरच आहे.
३. शिंदे समिती संथ: कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेली शिंदे समिती आता नवीन रेकॉर्ड शोधण्यात रस दाखवत नसल्याची टीका त्यांनी केली.
प्रमाणपत्र असूनही अडवणूक
ज्या मराठा बांधवांना कुणबी नोंदींचे पुरावे सापडले आहेत, त्यांना जात वैधता प्रमाणपत्र (व्हॅलिडिटी) मिळण्यात प्रचंड अडचणी येत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. पुरावे असूनही प्रशासनाकडून मराठा कुटुंबांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. हैदराबाद गॅझेटचा जीआर निघाला तेव्हा आम्ही सरकारचे कौतुकही केले होते, पण सातारा गॅझेटबाबत सरकारने फसवणूक केल्याचे ते म्हणाले.
शनिवारी पुढील रणनीती ठरणार
मराठा समाज आपल्या हक्काचा न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही, असे सांगत जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढची तारीख जाहीर करणार असल्याचे सांगितले. “आमची मुले आम्हाला सोन्यासारखी प्रिय आहेत, सरकारने आता त्यांच्या संयमाचा अंत पाहून आणखी बळी घेऊ नयेत,” असे भावुक आवाहनही त्यांनी सरकारला केले.
हे देखील वाचा – PM Modi on Foreign Travel Tax: परदेश प्रवासावर नवीन कर लागणार? सोशल मीडियावरील ‘त्या’ चर्चेवर स्वतः पंतप्रधान मोदींनी दिले स्पष्टीकरण










