Petrol-Diesel : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर सीएनजीची दरवाढ झाली, रिक्षा चालकांनी लगेच भाडेवाढ मागितली, त्यानंतर दूध 2 रुपयांनी महागले, आज सरकारने आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे कारण देत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लीटर प्रत्येकी 3 रुपये वाढ केली आहे. येत्या काही दिवसांत पुन्हा दरवाढ होईल असे संकेत आहेत. आताच्या परिस्थितीत या दरवाढीतून कंपनीला 48 हजार कोटी मिळणार आहेत. मात्र या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढणार असून, त्याचा थेट परिणाम दूध, भाज्या, किराणा आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होणार आहे.
पेट्रोल-डिझेलचे नवीन दर आजपासूनच लागू झाले आहेत. नवीन दरानुसार आजपासून राजधानी दिल्लीत पेट्रोल प्रति लीटर 97.77 रुपये व डिझेल 90.67 रुपये, मुंबईत पेट्रोल 106.68 आणि डिझेल 93.14 रुपये, कोलकात्यात पेट्रोल 108.74 व डिझेल 95.13, चेन्नईत 103.67 व डिझेल 95.25 रुपये झाले आहे. या दरवाढीमुळे रोजच्या प्रवासाचा खर्च वाढणार असून, वाहतूक भाडे आणि दैनंदिन वस्तूंच्या किमतीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
या दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीतील मोठी वाढ हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. इराण-अमेरिका तणाव आणि होर्मुज सामुद्रधुनी परिसरातील अस्थिर परिस्थितीमुळे जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम झाला असून, कच्च्या तेलाचे दर 70 डॉलरवरून वाढून 100 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले आहेत. केंद्र सरकारने यापूर्वी नागरिकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल व डिझेलच्या उत्पादन शुल्कात प्रत्येकी 10 रुपये कपात केली होती. पेट्रोलवरील शुल्क 13 रुपये प्रति लिटरवरून 3 रुपयांपर्यंत कमी करण्यात आले होते, तर डिझेलवरील शुल्क 10 वरून शून्य करण्यात आले होते. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील सततच्या चढ-उतारांमुळे आणि पुरवठा साखळीवरील ताणामुळे तेलाच्या किमती कायमस्वरूपी रोखून धरता येणार नसल्याने दरवाढीचे संकेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दोन दिवसांपूर्वी दिले होते. निवडणूक प्रक्रिया संपल्यावर ही दरवाढ लगेच केली जाईल अशी आधीपासून चर्चा होती.
सरकारच्या मते इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी कंपन्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढल्यावरही स्थानिक भाव स्थिर ठेवावे लागत होते. त्याची भरपाई सरकार करत होती. या कंपन्यांना पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या विक्रीवर दरमहा सुमारे 30,000 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. एक लीटर पेट्रोलमागे 14 रुपये, तर एक लीटर डिझेलमागे 42 रुपये तोटा होत आहे. त्याची भरपाई सरकारला करावी लागत होती. आता या दरवाढीतून ही भरपाई होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी पश्चिम आशियातील भू-राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन पेट्रोलियम उत्पादनांचा काळजीपूर्वक वापर करण्याचे आवाहन देशवासीयांना केले होते होते. पेट्रोल, गॅस आणि डिझेलचा वापर अत्यंत संयमाने करायला हवा. आपण आयात केलेल्या पेट्रोलियम उत्पादनांचा वापर केवळ गरजेनुसार केला तर केवळ परकीय चलनच वाचणार नाही, तर युद्धाचे प्रतिकूल परिणामही कमी होतील, असे पंतप्रधानांनी म्हटले होते. इंधनबचतीसाठी घरून काम करणे, मेट्रोने प्रवास आणि कारमधून एकत्र प्रवास करण्याचा सल्ला दिला होता.
पेट्रोल – डिझेल दरवाढीच्या घोषणेनंतर काँग्रेसने एक व्हिडिओ पोस्ट करून सरकारवर टीका केली. या व्हिडिओत म्हटले की, केंद्र सरकारने निवडणुका संपताच जनतेवर दरवाढीचा बोजा टाकला. नेपाळने पेट्रोलचे दर 2 रुपये, तर डिझेलचे दर 12 रुपयांनी कमी केले. ऑस्ट्रेलियाने उत्पादन शुल्क कमी करून पेट्रोल 17 ने स्वस्त केले. जर्मनीने तेलावरील कर कमी करून पेट्रोल आणि डिझेलचे दर 17 ने कमी करून 19 वर आणले. ब्रिटनने वीज बिलावर 100 पौंडची सूट दिली. जनतेला होणारा त्रास टाळण्यासाठी त्यांनी तेलावरील कर कमी केले. मात्र मोदी सरकारने काय केले? व्यावसायिक एलपीजीचे छोटे सिलिंडर 261 रुपयांनी, तर दूध 2 रुपये प्रति लिटरने महाग केले. सोने आणि चांदीवरील आयात शुल्क 15 टक्क्यांनी वाढवले. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वतंत्र पोस्ट करून म्हटले की, मोदी सरकारच्या चुकीची किंमत जनतेला मोजावी लागेल. 3 रुपयांचा फटका आधीच बसला आहे, उर्वरित वसुली हप्त्यांमध्ये केली जाईल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, देशभरात पेट्रोल-डिझेल महागले आहे. अमेरिकेत ही वाढ 51 टक्के आहे. मोदींनी फक्त 3 रूपये वाढवले.
सिंधुदुर्गात उबाठाचे आंदोलन
पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ उबाठा शिवसेनेने कणकवलीत माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. बसस्थानक ते आप्पासाहेब पटवर्धन चौकापर्यंत मोर्चा काढत शिवसैनिकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी वैभव नाईक म्हणाले की, पेट्रोल, डिझेलसोबतच सीएनजी आणि गॅस सिलिंडर दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दरवाढ थांबली नाही तर राज्यभर आंदोलन करू.










