Home / महाराष्ट्र / Dadar Street Food Video: दादर स्थानकाबाहेर इडली विक्रेत्याकडून शौचालयातील पाण्याचा वापर; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Dadar Street Food Video: दादर स्थानकाबाहेर इडली विक्रेत्याकडून शौचालयातील पाण्याचा वापर; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Dadar Street Food Video: मुंबईत धावपळीच्या जीवनशैलीमुळे हजारो चाकरमानी सकाळी घरातून न जेवताच निघतात आणि लोकल ट्रेनमधून उतरल्यावर रेल्वे स्थानकाबाहेरील...

By: Team Navakal
Dadar Street Food Video: दादर स्थानकाबाहेर इडली विक्रेत्याकडून शौचालयातील पाण्याचा वापर; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
Social + WhatsApp CTA

Dadar Street Food Video: मुंबईत धावपळीच्या जीवनशैलीमुळे हजारो चाकरमानी सकाळी घरातून न जेवताच निघतात आणि लोकल ट्रेनमधून उतरल्यावर रेल्वे स्थानकाबाहेरील स्टॉल्सवरच आपली सकाळची भूक भागवतात. दादर रेल्वे स्थानक परिसर तर अशा खवय्यांसाठी हक्काचे ठिकाण मानले जाते. मात्र, सध्या सोशल मीडियावर समोर आलेली एक क्लिप पाहिल्यानंतर बाहेरचे उघड्यावरील अन्न खाताना नागरिक आता शंभर वेळा विचार करतील.

इन्स्टाग्रामवर एका अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये, दादर स्थानकाबाहेरील एक इडली विक्रेता ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत थेट सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर करताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सर्वसामान्य मुंबईकरांच्या रोजच्या आयुष्यात इडली, वडापाव किंवा पोहे यांसारख्या स्ट्रीट फूडला खूप मोठे स्थान आहे. कमी खर्चात आणि चवदार पदार्थ मिळत असल्याने अनेक नोकरदार वर्ग रेल्वे स्टेशनबाहेरील फूटपाथवरील दुकानांना पसंती देतो. अनेक ठिकाणी स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळत असले, तरी काही विक्रेत्यांच्या अशा संतापजनक कृत्यांमुळे आता नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दादर स्टेशन परिसरातील फूटपाथचे दृश्य दिसत आहे. तिथे अनेक नाश्त्याच्या गाड्या लागलेल्या आहेत. त्यापैकी एक इडली विक्रेता तिथल्या एका सार्वजनिक शौचालयाजवळ जातो आणि तिथून पाण्याचा पांढरा कॅन भरून आणतो. त्यानंतर आजूबाजूला न पाहता ते पाणी तो थेट आपल्या स्टॉलवरील निळ्या रंगाच्या ड्रममध्ये ओतताना दिसतो.

अन्न तयार करण्यासाठी किंवा भांडी धुण्यासाठी थेट शौचालयातील पाण्याचा असा उघड वापर होताना पाहून नेटकऱ्यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर आला असून नागरिकांनी अन्न आणि औषध प्रशासनासह मुंबई महानगरपालिकेने या विक्रेत्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी लावून धरली आहे. अनेक युजर्सनी कमेंट्समध्ये आपले धक्कादायक अनुभव शेअर केले आहेत.

एका युजरने लिहिले की, दादर स्थानक परिसरात केवळ इडलीच नव्हे, तर चहा आणि लिंबू पाण्यासाठी वापरले जाणारे पाणीही अनेकदा अशाच ठिकाणचे अस्वच्छ असते, त्यामुळे तिथे काहीही खाणे टाळावे. काही जणांनी उपरोधाने पालिकेच्या पाण्याबद्दल कमेंट केली असता, इतरांनी त्यांना सुनावले की शौचालयाच्या परिसरात अनेक जीवघेणे विषाणू असतात, जे नळावाटे पाण्यात आणि पर्यायाने अन्नात मिसळल्यास मोठा आजार होऊ शकतो.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याची अधिकृत पुष्टी होऊ शकलेली नाही. तसेच या प्रकरणाची दखल घेऊन प्रशासनाने संबंधित विक्रेत्यावर काही दंडात्मक कारवाई केली आहे का, याबद्दलची माहिती अजून समोर आलेली नाही. तरीही या एका व्हिडिओने मुंबईतील स्ट्रीट फूडच्या स्वच्छतेचा आणि लोकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.

हे देखील वाचा – Fuel Price Hike: सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका! 5 दिवसातच पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ

Web Title:
संबंधित बातम्या