एकटा बास! मराठ्यांच्या सर्व मागण्या मान्य! मुख्यमंत्र्यांनी विजयाचा गुलाल लावला

नवी मुंबई- मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन इतर मागासवर्गीयांना आरक्षण मिळवून देण्याचा मराठा समाजाचा संघर्ष आज पूर्ण विजय प्राप्त करून शांत झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः नवी मुंबईला जाऊन सगेसोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसह सर्व मागण्या मान्य केल्याचा अहवाल मराठा नेते जरांगे पाटील यांच्या हाती सोपवला! या विजयानंतर मराठ्यांनी ‘एकटा बास’चे फलक उंचावत ‘मराठा 24 कॅरेट’च्या गाण्यावर थिरकत, गुलाल उधळून जेसीबीतून फुलांचा वर्षाव करीत जल्लोष साजरा केला. यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित नव्हते. अजित पवार कालपासून अज्ञातवासात गेल्याची चर्चा आहे तर देवेंद्र फडणवीस नागपुरात होते. आमदार बच्चू कडूही अनुपस्थित होते.
मनोज जरांगे-पाटील आंदोलन यशस्वी होऊन नवी मुंबई येथूनच आंदोलकांसह अंतरवाली सराठी गावी लगेचच परत निघाले. तोच ओबीसींच्या हक्कासाठी लढणारे छगन भुजबळ यांनी उद्या ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली. ते म्हणाले की, जरांगेंना फक्त मसुदा दिला आहे. त्यावर सूचना व हरकती मागवल्या आहेत. लाखो ओबीसी त्यावर सूचना पाठवतील, तेव्हा या प्रकरणाला दुसरी बाजू आहे हे सरकारच्या लक्षात येईल.
जरांगे-पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील मोर्चा काल मुंबईच्या सीमेवर पोहोचला. नवी मुंबई परिसरात आंदोलक आल्यानंतर सरकारच्या हालचाली वाढल्या. सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, औरंगाबाद विभाग आयुक्त मधुकर आरंगळ, मुख्यमंत्री कार्यालय स्वीय सचिव डॉ. अमोल शिंदे आणि सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी जरांगे यांच्या भेटीसाठी नवी मुंबईला पोहोचले. त्यांच्या मागण्या मान्य करणारा मसुदा त्यांना दाखवला. त्यानंतर जरांगे यांनी दुपारी 2 वाजता शिवाजी चौकात भाषण करून आंदोलकांना मसुदा वाचून दाखविला. मात्र अध्यादेश काढा अशी मागणी केली. अध्यादेश मिळेपर्यंत नवी मुंबईतच थांबण्याची सरकारची विनंती मान्य केली. रात्री उशिरा त्यांना अध्यादेश पाठवण्यात आला. मंत्री दीपक केसरकर व मंगलप्रभात लोढा यांनी प्रत्यक्ष जरांगेंची भेट घेऊन अध्यादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला.
आज सकाळीच बीड, संभाजीनगर पासून नवी मुंबई, आझाद मैदानात मराठा आंदोलकांनी विजयाचा जल्लोष सुरू केला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विजयोत्सव साजरा करण्याचे ठरले. जरांगे पाटील यांची गाडी विष्णुदास भावे सभागृहाकडे निघाली. मात्र मराठा आंदोलकांच्या प्रचंड गर्दीमुळे गाडी मुंगीच्या वेगाने पुढे जात होती.
मुख्यमंत्री विष्णुदास भावे नाट्यमंदिरातून निघाले, सोबत गिरीश महाजन व मंगलप्रभात लोढा, संजय शिरसाट व्यासपीठाकडे निघाले. ‘शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा होत होत्या, मुख्यमंत्री शिंदे, जरांगे-पाटील, गिरीष महाजन, दीपक केसरकर हे क्रेनने वर गेले आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला. त्यानंतर रांगेत उभा राहिलेल्या जेसीबीतून मुख्यमंत्री व जरांगे पाटील यांच्यावर जोरदार पुष्पवृष्टी करण्यात आली. मुख्यमंत्री व जरांगे यांनी हात धरून उंचावला. सकल मराठा समाज (नवी मुंबई)च्या वतीने पुष्पहार घालून दोघा नेत्यांचा पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी अध्यादेशाची प्रत जरांगेच्या हातात दिली आणि त्यांनी जवळ घेऊन त्यांची पाठ थोपटली. मुख्यमंत्री शिंदेंनी संत्र्याचा रस देऊन त्यांचे उपोषण सोडवले. सर्वजण मंचावर आल्यानंतरही जरांगे-पाटील उभे राहून गर्दी नियंत्रित करीत होते. थोड्या वेळात पुष्पवृष्टीत मुख्यमंत्री व जरांगे यांनी एकमेकांना गुलाल लावला, पेढा भरवला, तलवार भेट दिली. भगवी शाल दिली.
त्यानंतर मनोज जरांगे-पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी हा संघर्ष सुरू होता. गेले साडेचार महिने आपण संघर्ष केला. शिंदे साहेबांना एवढीच विनंती की, 350 मुलांनी आरक्षणासाठी आत्महत्या केली. त्यांची कुटुंबे उघडी पडली. माझी मुले अंतरवाली पासून निघाली तेव्हापासून रस्त्यावर झोपली. मीही त्यांना शब्द दिला. त्यांचा संघर्ष वाया जाऊ देणार नाही ज्याची कुणबी नोंद मिळाली. त्याच्या गणगोतातील सर्वांना प्रमाणपत्र दिले जाईल. आता हा गुलाल उधळला त्याचा अपमान होऊ देऊ नका. हा अध्यादेश कायम राहिला पाहिजे. आरक्षणात टाकलेल्या खुट्या आम्ही फेकल्या. मराठ्यांच्या नादाला लागायचे नाही. ओबीसी आमचे बंधू आहेत. गावात आमचे एकमेकांवर प्रेम आहे. नेते आमच्यात भांडण लावतात. आता त्यांनी विरोध करू नये. यानंतर जेवण करून दमाने निघायचे. अंतरवालीला बैठक घेऊन पुढचा निर्णय होईल. जर अध्यादेशाला धोका झाला तर आझाद मैदानावर उपोषणाला मी पहिला येईन.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, या घोषणेने भाषणाला सुरूवात केली. ते म्हणाले की, सकल मराठा समाजाच्या एकजुटीचा आणि ज्यांनी संघर्ष केला ते जरांगे पाटील यांचे अभिनंदन करतो. मी मुख्यमंत्री म्हणून सांगतो की, आपली एकजूट कायम ठेवली. संयम व शिस्तीने आंदोलन केले. गालबोट न लावता लाखोंचे आंदोलन यशस्वी केले त्याबद्दल धन्यवाद देतो. जरांगे पाटील व तुमचे एकमेकांवर असलेले प्रेम पाहायला मिळाले. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. गोरगरीब मराठ्यांच्या
दुःखाची कल्पना आहे. म्हणून मी शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि ती पाळण्याचे काम हा एकनाथ शिंदे करतो आहे. हा ऐतिहासिक क्षण आहे. मराठा समाजाने अनेकांना मोठे केले, त्यांना पदे मिळाली, पण समाजाला त्यांनी न्याय दिला नाही. आज विजयाचा दिवस आहे. मी तुमच्या प्रेमापोटी इथे आलो आहे. मराठा व ओबीसी गावात एकत्र नांदतो, मराठ्याला कुणाच्या हक्काचे घ्यायचे नाही, त्याच्या हक्काचे हवे आहे असे मनोज जरांगे म्हणतात. आम्ही ते मान्य केले. मराठा समाजाला ओबीसीचे अधिकार व सवलती दिल्या जातील.
या सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची अंमलबजावणी सरकार करील, असा मी शब्द देतो. आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार आणि इतर मंत्र्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे.
मनोज जरांगेंचे अभिनंदन करताना नागपूरहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी आधीपासूनच सांगत होतो की, कायदेशीररित्या आरक्षण द्यावे लागेल. संविधानाच्या चौकटीत राहून आरक्षण द्यावे लागेल. सरसकट आपल्याला करता येणार नाही. मात्र ज्यांच्याकडे नोंदी आहेत, त्यांच्या रक्ताच्या नात्यातील लोकांना आपल्याला प्रमाणपत्र देता येईल. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे देखील आदेश आहेत. ओबीसींवर अन्याय होणार नाही. छगन भुजबळ यांना सांगू इच्छितो की, ओबीसींवर अन्याय होईल, असा कुठलाही निर्णय सरकारने घेतला नाही. नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी आता दूर केल्या आहेत. ज्यांच्या नोंदी नाहीत, पुरावा नाही त्या लोकांना प्रमाणपत्र देण्यासंदर्भात निर्णय नाही. क्युरेटिव्हमध्ये मार्ग निघाला नाही तर दुसरा मार्ग म्हणजे सर्वेक्षण सुरू आहे. क्युरेटिव्हमध्ये सकारात्मक मार्ग निघेल अशी आशा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जरांगे-पाटील यांचे अभिनंदन केले.
राज्यभरात आनंदोत्सव
राज्यभरात समाज बांधवांनी उत्सव साजरा केला. मनोज जरांगे यांनी ज्या ठिकाणाहून आरक्षणाचा लढा उभा केला त्या अंतरवाली सराटी गावांमध्ये गावकऱ्यांनी जल्लोष केला, फटाके फोडून पेढे भरवत, गुलाल लावून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. गावांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. याशिवाय जरांगे-पाटील यांच्या मूळ गावी मातोरी येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली. गुलाल उधळत पेढे वाटण्यात आले. नाशिकच्या येवल्यातील विंचूर चौफुली येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. हातात भगवे ध्वज घेवून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा’ अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून, फटाके फोडून, एकमेकांना पेढे भरवत मराठा बांधवांकडून जल्लोष साजरा केला. यावेळी डीजेच्या तालावर मराठा बांधवांनी ठेका धरला होता. विशेष म्हणजे, मराठा समाजातील महिला यात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. परभणीच्या कातनेश्वर गावामध्ये महिलांनी घरांसमोर वेगवेगळ्या रांगोळ्या काढल्या व साखर वाटण्यात आली.
छगन भुजबळ संतप्त
ही सूचना टिकणार नाही

मुंबई- मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीत आरक्षण देण्यास विरोध करणारे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ प्रतिक्रिया देत म्हणाले, मराठा समाजाचा विजय झाला असे वाटत असले तरी मला मान्य नाही. अशा प्रकारच्या झुंडशाहीने कायदे बदलता येत नाहीत. कुणाला न घाबरता आणि विशेष सवलत न देता राज्य करू अशी आम्ही मंत्रिपदाची शपथ घेतली. आज जी दिली ती केवळ सूचना आहे, याचे रुपांतर कायद्यात नंतर होईल. 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवल्या आहेत. ओबीसी व इतर समाजाच्या वकिलांनी हरकती पाठवाव्या. लाखोंच्या संख्येने पाठवाव्या म्हणजे सरकारच्या लक्षात येईल की याला दुसरी बाजू आहे. आम्ही समता परिषदेतून योग्य कारवाई करू.
सगेसोयरे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, असे माझे मत आहे. तुम्ही ओबीसीच्या आरक्षणात आल्याचा आनंद साजरा करीत आहात. पण त्या 17 टक्क्यात सर्वच येतील. इडब्लूएस खाली तुम्हाला 10 टक्के आरक्षण मिळत होते, ओपनमध्ये, 40 टक्के आरक्षण मिळत होते ते मिळणार नाही. 50 टक्क्यात तुम्हाला संधी होती ती गमावून आता 17 टक्क्यात 314 जातींबरोबर 70-80 टक्के ओबीसीसह तुम्हाला आरक्षण घ्यावे लागेल. तुम्ही मागच्या दिशेने येत आहात, पण 50 टक्के मधील आरक्षण सोडले.
जात जन्माने येते, शपथपत्राने येत नाही. शपथपत्रावर जात देणे हे कायद्याच्या विरोधात आहे. दलित, आदिवासींनाही हे नियम लावले तर दलित, आदिवासींमध्येही घुसतील. कारण अनुसुचित जाती-जमातींनाही हे लागू होईल. म्हणजे कुणीही या शपथपत्र द्या की झाले. ही सर्व फसवणूक आहे.
सरसकट गुन्हे मागे कसे घेणारे, पोलिसांवर हल्ले केले, घरे जाळली ते गुन्हे मागे घेतले तर सर्व ठिकाणी हे लागू होईल. सरकारी भर्ती लागू करायची नाही. क्युरेटिव्ह पीटिशन निकाल येईपर्यंत महाठ्यांना शिक्षण मोफत देणार मग सगळ्या समाजाला का नको? उद्या 5 वाजता ओबीसी, दलित आदिवासी, विशेषतः ओबीसी नेत्यांना माझ्या निवासस्थानी पक्ष व संघटनांचा अभिनिवेश सोडून चर्चेला यावे. पुढे काय करायचे त्याचा निर्णय घेऊ. हा केवळ मसुदा आहे. त्यानंतर नोटिफिकेशन निघाले की मग कोर्टात जाऊ. आणखी कुणी लाखो लोक घेऊन आले तर कायदा बदलणार का?
मान्य मागण्या
सगेसोयरे म्हणजे लग्नाच्या सोयरी जुळतात त्या सर्वांना शपथपत्र देऊन कुणबी प्रमाणपत्र मिळेल. विवाह संबंधातून निर्माण झालेली नाही आणि रक्ताच्या सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र असलेल्याने शपथपत्र दिले तर त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. मराठ्यांना ओबीसीच्या सर्व सवलती मिळतील, कुणबी नोंदी शोधायला शिंदे समितीला तूर्त दोन महिन्यांची मुदतवाढ दिली, आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतले जातील. मराठवाड्यातील नोंदीसाठी गॅझेट काढणार, वंशावळी तपासायला तालुका पातळीवर समिती नेमली जाईल. बॉम्बे आणि सातारा गॅझेट स्वीकारणार.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top