जीतन राम मांझी यांचा काँग्रेससोबत जाण्यास नकार?

पाटणा – बिहारमधील राजकीय घडामोडींचा वेग आज अधिकच वाढला. सकाळपासूनच दिल्लीत आणि पाटणामध्ये जदयू, भाजपा, राजद आणि काँग्रेस यांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले होते. लालुप्रसाद यादव यांची साथ सोडून नीतिशकुमार मोदींच्या गोटात जाणार हे जवळपास निश्चित झाल्याने राजद नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवांनी आपल्या आमदारांची बैठक घेऊन बराच खल केला. काँग्रेस नेते राहुल गांधी न्याय यात्रा सोडून परतले. त्यांनी नवीन समीकरण जुळवून आणण्यासाठी माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांना महागठबंधनमध्ये येण्याचा प्रस्ताव दिला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेश बघेल यांची महागठबंधनचे वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यावर मांझी यांना महागठबंधनमध्ये आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. मांझी तयार झाले, तर तेजस्वी यादव यांचे सरकार तरू शकेल. परंतु रात्री उशिरा मांझी यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीत जाण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले.
नीतिशकुमार महागठबंधनमधून बाहेर पडल्याची अधिकृत घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकेल. नीतिशकुमार यांना पाठिंबा देण्याबाबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची आज पाटण्यात बैठक झाली. भाजपाचे राज्यसभेतील खासदार आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, केंद्रीय मंत्री नित्यानंद राय, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह आदिंचा त्यामध्ये समावेश होता. बैठकीत सहमती झाल्यानंतर भाजपाच्या वतीने नीतिशकुमार यांना पाठिंब्याचे अधिकृत पत्र दिले जाईल.
बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री नीतिशकुमार लालुंच्या राजदची साथ सोडून पुन्हा भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये दाखल होणार अशी चर्चा होती. त्यामुळे राजदच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. राजद आणि नीतिशकुमार यांच्या जदयूच्या बैठकांचे सत्र सुरू झाले होते. मात्र नीतिशकुमारांचे तळ्यात -मळ्यातच सुरू होते.22 जानेवारी रोजी अयोध्येतील राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण असूनही ते गेले नव्हते.मात्र त्याचवेळी ते राजद नेता आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याशी अंतर ठेवून वागत होते. लालुप्रसाद आणि तेजस्वी यादव यांनी काही दिवसांपूर्वी नीतिशकुमारांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आगामी लोकसभा निवडणूक आम्ही नीतिशकुमारांच्या नेतृत्वाखाली लढविणार असे तेजस्वी यादव यांनी जाहीरही केले होते. पण तरीही नीतिशकुमार गप्पच होते. त्यामुळे ते भाजपाच्या गोटात जाणार अशा चर्चांना उधाण आले होते. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त विधानभवनावर आयोजित चहापान कार्यक्रमाला तेजस्वी यादव गैरहजर राहिले. दुसरीकडे नीतिशकुमार या कार्यक्रमादरम्यान भाजपाच्या दिग्गज नेत्यांशी हस्तांदोलन करताना दिसले. त्याचवेळी नीतिशकुमार भाजपाच्या गोटात जाणार असे स्पष्ट संकेत मिळाले होते. नीतिशकुमार यांनी आता त्यांच्या पक्षाच्या सर्व आमदारांना पाटण्यात हजर राहण्यास सांगितले होतेे.
दरम्यान, जदयूच्या विधिमंडळ पक्षाने नीतिशकुमार यांच्या निवासस्थानी आज संध्याकाळी होणारी बैठक एक दिवस पुढे ढकलली. आता ही बैठक उद्या सकाळी 10 वाजता होणार आहे. या बैठकीनंतर नीतिशकुमार अंतिम निर्णय घेणार असून ते राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करणार असल्याची चर्चा आहे.
भाजपाचे दोन उपमुख्यमंत्री
जदयू आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आज सरकार स्थापन करण्याबाबत बराच खल झाला. नीतिशकुमार मुख्यमंत्री तर भाजपाला दोन उप मुख्यमंत्रिपदे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद असा फॉर्म्युला ठरला आहे. जदयू-भाजपा सत्तेवर येण्यासाठी 122 आमदारांची गरज आहे.
राजदचाही दावा
राज्यात लालुप्रसाद यांच्या राजदचे सर्वाधिक 79 आमदार आहेत. त्यामुळे नीतिशकुमार यांच्या सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेऊन स्वतः सत्ता स्थापनेचा दावा करावा असा राजदचा प्रयत्न आहे. जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चा या पक्षाचे केवळ 4 आमदार आहेत. पण ते तेजस्वी यांच्यासोबत आल्यास समिकरण बदलू शकेल, असे बोलले जाते.
पक्षीय बलाबल
एकूण सदस्य – 243
बहुमतासाठी आवश्यक – 122
राजद – 79
भाजपा – 78
जदयू – 45
काँग्रेस – 19
डावे पक्ष- 16
अपक्ष – 01

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top