झेक प्रजासत्ताकच्या विद्यापीठात अंदाधुंद गोळीबार!१५ विद्यार्थी ठार

प्राग

झेक प्रजासत्ताकच्या चार्ल्स विद्यापीठामध्ये काल रात्री एका अज्ञात बंदूकधारी हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार झाला. यात १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर ३० जण जखमी झाले. त्यातील १३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेत हल्लेखोराचाही मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला.या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात विद्यार्थी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळताना दिसत आहेत.

गोळीबारादरम्यान विद्यार्थांनी स्वत:ला वर्गात कोंडून घेतले, तर काही विद्यार्थी इमारतीच्या गॅलरीमध्ये लपले. यावेळी एका विद्यार्थ्याचा खाली पडून मृत्यू झाला. चार्ल्स विद्यापीठाच्या फिलॉसॉफी कॅम्पसमध्ये ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हल्लेखोराला आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते, पंरतु त्याने पोलिसांवरही गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला, मात्र रुग्णालयात नेताना त्याचा मृत्यू झाला. पोलीस प्रमुख मार्टिन वोन्ड्रासेक यांनी सांगितले की, काल कॉलेजचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर विद्यार्थ्यांना नाताळच्या सुट्ट्या सुरू होणार होत्या. गोळीबार करणारा व्यक्ती एकटाच नव्हता. त्याच्यासोबत आणखी काही जण असण्याची शक्यता आहे. विद्यापीठात गोळीबार होण्यापूर्वी प्रागच्या पश्चिमेकडील हॉस्टन येथील गावात हल्लेखोराचे वडील मृतावस्थेत आढळले होते. त्यांचीही हत्या हल्लेखोरानेच केली असावी असा पोलिसांना संशय आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top